top of page

उद्योगाची तयारी करताना...

Writer's picture: Sarika Bhoite PawarSarika Bhoite Pawar



पुर्वी उद्योग, व्यापार, व्यवसाय हे पिढीजात होते पण आता परिस्थिती बदलली आहे. आता उद्योगात कुणा विशिष्ट वर्गाची मक्तेदारी राहिली नाही. उद्योजकीय मानसिकता व गुणसंपदा असलेली कोणतीही व्यक्ती ही उद्योजक होऊ शकते.


समाजात अनेक व्यक्तिमत्वे, अनेक भाषा, अनेक जाती व वर्गाचे लोक राहत असले तरी प्रामुख्याने समाजात राहणाऱया व्यक्तींच्या प्रकारामध्ये दोन प्रकार प्रामुख्याने पडतात एक काम मागणारे व्यक्ती व दुसरे काम देणारे व्यक्ती. काम मागणाऱया व्यक्ती मध्ये सुद्धा सोपावलेली कामे कार्यकुशलपणे सांभाळणारे, कार्यक्षमतेनुसार काम करणारे व्यक्ती असतात. तर दुसऱया प्रकारामध्ये काम देणाऱया व्यक्ती असतात. काम मागणाऱया व्यक्तींच्या तुलनेने काम देणाऱया व्यक्तींची संख्या कमी असते, पंरतु ते प्रभावी असतात. समाजात बदल घडवून आणण्याची क्षमता, यांच्यामध्ये असतात. हा वर्ग म्हणजेच ‘उद्योजक’ होय.


उद्योजकीय मानसिकता हळूहळू निर्माण होऊ लागली आहे.उद्योजक बनल्यामुळे संपत्तीची निर्मिती तर होतेच पण त्याबरोबर समाजात मानसन्मान व प्रतिष्ठाही मिळते. छोटासा उद्योग करणारा सुद्धा चार हातांना काम देत असतो,त्यामुळे मोठा उद्योग समूह कितीतरी कुटुंबाच्या उपजिविकेला सहाय्य करत असतो.

बहुतेकवळा ज्यावेळेस युवक, युवतीन नवीन उद्योग समुपदेशनासाठी येतात तेव्हा त्यांची एक मागणी असते की, पांरपारिक उद्योग करणारे खूप आहेत, आम्हाला काहीतरी नवीन उद्योग सुरु करायचा आहे. खर सांगायच झाल तर काळ बदलला की राहणीमान बदलते आणि त्यानुसार काळाप्रमाणे व्यवसायाची परिमाणे ही बदलात पण त्यामुळे पांरपारिक उद्योग कुठे अडचणीत येत नाही. वस्तुत या पांरपारिक उद्योगांनाच नव्या स्वरुपात मांडून त्याच रुपड बदलायच असत. एवढच आज असंख्य संधी आपली दारे ठोठावत आहेत पण आपली अभिरुची, आपली कार्यक्षमता, आर्थिक कुवत याचा सखोलतेने विचार करुनच उद्योग सुरु करायचा असतो.


विचार आणि कृतीची सांगड


उद्योगाच्या यशस्वितेबाबतची साशंकता, आत्मविश्वासाचा अभाव,यामुळे उद्योग सुरु करताना प्रचंड दडपण नवीन उद्योजकांच्या मनात असते. या सर्व नवउद्योजकांनी खरं तर हे लक्षात घेतले पाहिजे की, विचार हाच प्रत्येक गोष्टीचा प्रारंभ आहे. माणसाच्या विचारातच यशाचे गमक लपले आहे असे म्हंटले तर वावगे ठरणार नाही. आपणास जे मिळवायचे आहे, ज्या क्षेत्रात प्रगती करायची आहे त्याबद्दल आपला विचार सकारात्मक असला पाहिजे आणि जी गोष्ट मिळवायची आहे त्याचा विचार केला पाहिजे, अगदी खोलवर विचार केला पाहिजे.

विचारांचे सामर्थ्य प्रचंड आहे. मला व्यवसाय करायचा आहे, मला या क्षेत्रात विशेष प्राविण्य मिळवायचे आहे असा विचार करुन केवळ भागत नाही. तर त्यासाठी त्या विचारांना कृतीची जोड दिली पाहिजे. पण या कृतीला दिशाही विचारातून मिळते. त्यामुळे मी हे करु शकत नाही, हे अशक्यच आहे असं सतत म्हणू नका. अप्रत्यक्षपणे तुम्ही नकारात्मक विचारांना खतपाणी घालत असता. तुम्ही भरपूर मेहनत व प्रयत्न केले तर जगात कोणतीही गोष्ट करणे अशक्य नाही. प्रयत्नांची पराकाष्ठा करून आपण असाध्य गोष्ट साध्य करू शकतो. प्रसन्न व्यक्तिमत्व आणि सकारात्मक विचार ठेवले तर नक्कीच तुम्ही यशस्वी होऊ शकता. If you think you can....you can.If you think you can’t .....then you Can’t. So always think Positive.


उद्योगसंधी शोधताना, उद्योगाची निवड करताना


व्यक्तीच्या आयुष्यात अनेक निर्णय महत्त्वपूर्ण असतात आणि हे निर्णय वेळेत आणि योग्य विचार करुनच घ्यावे लागतात. विवाह करताना कित्येक गोष्टींना प्राधान्य दिले जाते. पत्रिका, रंग, रुप, वय,जोडीदाराची मिळकत इ. पण व्यवसाय करताना अथवा उद्योगाची निवड करतानाही तितकेच महत्त्व दिले गेले पाहिजे कारण या दोन्ही गोष्टी व्यक्तीच्या आयुष्यात अमुलाग्र बदल करत असतात. अचूक उद्योगसंधी निवडणे खूप गरजेचे आहे. व्यक्तीने आपले शिक्षण, तांत्रिक कौशल्य, अनुभव, उद्योगासाठी लागणारे भांडवल, मार्केटिंग इ. बाबी विचारात घ्याव्यात. एखादी संधी आपल्यासमोर असेल, तर त्याचा संपुर्ण अभ्यास, तज्ञांचा सल्ला, बाजारपेठ पाहणी, उद्योग परंपरागत आहे की त्याची संकल्पना अगदी नवीन आहे.


उद्योगाचे प्रशिक्षण


उद्योजक व्हायची, व्यवसायिक व्हायची इच्छा बहुतेकांची असते पण त्यासाठी जोखीम घेण्याची वृत्ती, योग्य व अचूक निर्णय घेण्याची क्षमता, उद्योगासाठीचे साहस आणि महत्त्वपूर्ण म्हणजे उद्योग यशस्वी करण्याची महत्त्वकांक्षा हे सर्व गुण प्रत्येक व्यक्तींमध्ये असतीलच असे नाही. एकूणच उद्योजकीय व्यक्तिमत्व घडणे खूप महत्त्वाचे असते आणि अशा व्यक्तिमत्वासाठी उद्योजकता विकास करणे, उद्योजकीय मार्गदर्शन व प्रशिक्षण घेणे महत्त्वपूर्ण ठरते. अशा प्रशिक्षणांमध्ये स्वयंरोजगाराच्या/उद्योगाच्या विविध संधी कशा शोधाव्यात, उद्योजकीय मानसिकता, उद्योगाची निवड, व्यवसाय संबंधित कर्ज देणाऱया शासकीय संस्था व त्यांच्या विविध योजना, बाजारपेठ पाहणी तंत्र व अहवाल तयार करणे, यशस्वी उद्योजकांशी चर्चा आणि लघुउद्योगांना प्रत्यक्ष भेटी, प्रकल्प अहवाल तयार करणे, मार्केटिंग, पॅकेजिंग इत्यादी विषयांचा समावेश असतो. अशा प्रकारचे उद्योजकीय प्रशिक्षण घेणे उद्योग सुरु करु इच्छिणाऱयांसाठी, तसेच नवीन उद्योग असणाऱयांसाठी सुद्धा उपयुक्तच आहे.


उद्योगासाठी आवश्यक बाबींची यादी तयार करा


उद्योगासाठी विविध प्रश्नांची यादी तयार करा. का, कसे, कुठे उद्योग का सुरु करावासा वाटतो, उद्योग कसा सुरु करणार आहात, मालाची विक्री कुठे व कशी करणार आहोत हे क्रमवार कागदावर लिहून काढा. त्यासाठी निकष लावा.या सर्व निकषामध्ये आपण निवडलेला उद्योग/ व्यवसाय आपल्या क्षमतेमध्ये बसतो का? उद्योगासाठी जागा, कच्च्या मालाची उपलब्धता, उत्पादनाचा प्रकार, बाजारपेठ, विक्री व्यवस्था, स्पर्धा, दर्जा, गुणवत्ता, किंमती या सर्वांची यादी करुन उद्योगाची निवड करावी.


शासकीय धोरण व इतर आवश्यक माहिती


जो काही उद्योग व्यवसाय निवडणार असाल त्याबद्दल शासनाचे धोरण काय आहे? पुढील काळात हे धोरण कसे असेल? वेळोवेळी शासनाचे धोरण उद्योसंदर्भात जाहिर करत असते त्यावेळेस त्या धोरणांचा अभ्यास करणे संयुक्तिक ठरेल. व्यवसाय हा प्रोपायटरी, पार्टनरशिप की प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या स्वरुपात करणार आहात, त्यासाठी शासनाचे नियम, कायदेकानून याची माहिती असणे आवश्यक आहे. त्याशिवाय उद्योगाची स्थायी/ अस्थायी नोंदणी, विविध प्रकारचे पररवाने, कंपनी कायदा, कारखाने अधिनियम, मुंबई दुकाने व आस्थापना कायदा, कामगार कायदे यांची माहिती करुन घेणे. आपल्या उद्योगासाठी कोणते परवाने, शासकीय बाबी, वेगवेगळे कर यांची माहिती करुन घेणे देखील आवश्यक ठरते.

उद्योगाचा प्रकल्प अहवाल


जो व्यवसाय/उद्योग निवडणार आहात त्याचा प्रकल्प अहवाल उद्योजकाने तयार केल्यास त्याला उद्योग/ व्यवसायातील पुढील 5 वर्षाच्या कामकाजाचा, उद्योगाच्या विकासाचा अंदाज येईल. त्यामुळे त्यानुसार उद्योगविषयक धोरण, उत्पादनाविषयी निर्णय, बाजारपेठेविषयी निर्णय घेणे, धोरण ठरवणे, आराखडा तयार करणे शक्य होईल. या प्रकल्प अहवालाचा उपयोग उद्योगासाठी शासकीय कर्ज मिळवताना, विविध परवाने तसेच परवानग्या मिळवताना होतो.उद्योजकीय प्रकाशनांचा व प्रकाशित माहितीचा अभ्यास करणे उद्योजकतेविषयीचे लिखाण, प्रकाशन, उद्योजकता व व्यवसायाविषयी मार्गदर्शन करणारी अनेक प्रकाशने आज बाजारात उपलब्ध आहेत. या प्रकाशनांचा तसेच उद्योगविषयक विविध प्रकारच्या माहितीचे संकलन करणे, माहिती जमा करणे, उद्योजकीय पुस्तके वाचणे व त्याचा अभ्यास करणे उद्योगाचा श्रीगणेशा करताना खूप मोलाचे ठरेल. उद्योगाच्या विकासाचा अंदाज येईल. त्यामुळे त्यानुसार उद्योगविषयक धोरण, उत्पादनाविषयी निर्णय, बाजारपेठेविषयी निर्णय घेणे, धोरण ठरवणे, आराखडा तयार करणे शक्य होईल. या प्रकल्प अहवालाचा उपयोग उद्योगासाठी शासकीय कर्ज मिळवताना, विविध परवाने तसेच परवानग्या मिळवताना होतो.


उद्योगाचे भविष्यातील नियोजन


उद्योग सुरु करायचे ठरवले की लगेचच करता येत नाही, त्याचे योग्य नियोजन करणे महत्त्वाचे ठरते. हे नियोजन करताना 5 ते 10 वर्ष इतके मर्यादित न करता दूरदृष्टीने करणे खूप महत्त्वाचे आहे. उद्योगाचे भविष्य, स्पर्धक, तंत्रज्ञानामधील बदल, ग्राहकाची आवड-निवड, त्यासाठी उपलब्ध असणारे तसेच उपलब्ध होणारे विविध पर्याय याचा विचार केल्यास उद्योजकाला पुढील भविष्यात अडचणी येणार नाहीत.

नवउद्योजकाने आपली आर्थिक क्षमता, व्यवसायाच ज्ञान, कौशल्य अनुभव याचा विचार केला पाहिजे आणि आपण कोणता व्यवसाय करावा याविषयी तज्ञांच मत नक्कीच घेतल पाहिजे त्यामुळे व्यवसाय करणे शक्य होईल. तसेच व्यवसायातील बारकावे, महत्त्वाच्या गोष्टी समजतील. “पाया मजबूत असेल तर इमारत ही मजबूत तयार होते ’’ असं म्हटल जात उद्योगासाठी काही तत्वे, मूल्ये आणि उद्दिष्ट असतील तर निश्चितच उद्योग सुरळीत पणे चालू राहील.

निश्चित उद्दिष्ट, त्वरित व अचूक निर्णय, कार्यक्षम योजना, कृती आणि चिकाटी या उद्योगासाठी आवश्यक आहेत.

उद्योग सुरु करताना नवीन उद्योजकाने आपल निश्चित उद्दिषट ठरवणे खूप महत्त्वाचे आहे कारण निश्चित उद्दिष्ट आणि यशासाठीच स्वप्न माणसाला प्रेरणा देत, सामर्थ्य देत आणि ते पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करण्याची क्षमता सुद्धा निर्माण करत. उद्योग आज सुरु केला आणि उद्या लगेचच तो मोठा होईल असे नाही. उद्योगात यश मिळविण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतात. अहोरात्र कष्ट करुन छोटस का होईना उद्योगाच विश्व उभाराव लागत आणि जर सातत्य, चिकाटी, आत्मविश्वास नाविन्याचा ध्यास घेतला तर छोट्या उद्योगाच मोठ्ठ साम्राज्य व्हायला वेळ लागत नाही.


कुठलाही उद्योग निवडताना तज्ञांचा सल्ला घ्या, मार्गदर्शन मिळवा, सुरुवातीला कमी गुंतवणुकीमध्ये उद्योग उभारा, उद्योजकीय मानसिकतेसाठी प्रशिक्षण घ्या, योग्य नियोजन व भविष्याची आखणी करुन त्यादृष्टीने पावले उचला. लक्षात ठेवा की उद्योजक हा स्वतच्या क्षमतेचा पुरेपुर वापर करुन स्वविकास करतो, समाजात प्रतिष्ठा मिळवतोच पण देशाच्या औद्योगिक विकासात व प्रगतीत त्याचा मोलाचा वाटा असतो म्हणूनच स्वउद्योगाच्या महत्त्वकांक्षेसाठी स्वप्नांचा पाठलाग करायला लागा.


0 comments

Comments


bottom of page